Monday, August 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी डॉ. कांचन मदारवर गर्भपात प्रतिबंध कायद्याने गुन्हा

डॉ. कांचन मदारवर गर्भपात प्रतिबंध कायद्याने गुन्हा

गर्भपाताच्या आढळल्या गोळ्या : जिल्हा रुग्णालय अहवालानंतर लाचलुचपत विभागाकडून कारवाई

रत्नागिरी:- लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आलेल्या डॉ. कांचन मदार हिच्यावर आता गर्भपात प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मदार वैद्यकीय अधिकारी असलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात २०२० पासून गर्भपाताच्या (एमटीपी) गोळ्यांचा साठा उपलब्ध नव्हता असे आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात आढळून आले होते. त्यामुळे डॉ. मदारकडे आढळून आलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याप्रकरणी आता डॉ. मदार हिच्यावर लाचलुचपत विभागाने गर्भपात प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (४८, रा. पागमळा, चिपळूण) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३ जून रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले. या कारवाईने जिल्हा आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तक्रारदारांच्या अर्जानुसार एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, डॉ. मदार हिने गर्भपाताच्या किटसाठी ४ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

डॉ. मदार यांच्या अटकेनंतर जिल्ह्यातील आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. तसेच यासंदर्भात चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चौकशीमध्ये डॉ. मदार काम करत असलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात २०२० सालापासून गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांचा साठा उपलब्ध नव्हता, तसेच कामथे रुग्णालयाकडून अशा गोळ्यांची मागणी देखील जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे करण्यात आली नव्हती. त्यामुळे कांचन मदारकडे आढळून आलेल्या गोळ्यांमुळे अवैध गर्भपाताचा संशय व्यक्त केला जात होता.

जिल्हा रुग्णालय प्रशानाकडून लाच लुचपत विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार डॉ. मदार यांच्याकडे आढळून आलेल्या गोळ्या कोणत्या आहेत. त्यासंदर्भात
माहिती उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली. दरम्यान लाचलुचपत विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या गोळ्यांबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयाला देण्यात आली होती. यामध्ये मदारकडे आढळलेल्या गोळ्या गर्भपाताच्याच असल्याचे स्पष्ट झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाने लाच लुचपत विभागाला पाठविला होता. यानंतर डॉ. मदार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.