Wednesday, November 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी आंबा घाटात ७ कि.मी.च्या सहापदरी बोगद्याचा केंद्राकडे प्रस्ताव

आंबा घाटात ७ कि.मी.च्या सहापदरी बोगद्याचा केंद्राकडे प्रस्ताव

अडीच हजार कोटींचा भव्य आराखडा!

रत्नागिरी:- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात आव्हानात्मक आणि धोकादायक मानल्या जाणाऱ्या आंबा घाटाला आता थेट बोगद्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या घाटात सुमारे ७ किलोमीटर लांबीचा भव्य सहापदरी बोगदा उभारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे २ हजार ५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला आहे. केंद्राकडे सादर करण्यात आलेल्या तीन पर्यायी आराखड्यांपैकी नेमक्या कोणत्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळतो, याकडे संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सध्या मिऱ्या-कोल्हापूर-नागपूर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, आंबा घाटातील रस्ता अनेक ठिकाणी निमुळता व तीव्र वळणांचा असून पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याचा मोठा धोका असतो. या सर्व अडथळ्यांवर मात करून प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी या बोगद्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित बोगदा तब्बल ७ किलोमीटर लांबीचा, सहापदरी आणि साडेपाच ते सहा मीटर उंचीचा असेल. यामुळे भविष्यात या मार्गावरील अवजड वाहतुकीची कोंडी कायमची टळणार आहे. महामार्ग प्राधिकरणाने या बोगद्यासाठी भौगोलिक रचना, पर्यावरणीय परिणाम आणि तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून तीन वेगवेगळ्या 'अलाइनमेंट'चे (मार्गाचे नकाशे) प्रस्ताव तयार केले आहेत. हे तिन्ही प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आले असून, त्यातील एका आराखड्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच या प्रकल्पाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. आंबा घाटातील हा सहापदरी बोगदा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि तितकाच खर्चिक आहे. सुमारे ७ किलोमीटरच्या या बोगद्यासाठी अडीच हजार कोटी रुपयांचा भरीव निधी अपेक्षित आहे. या प्रस्तावाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुजोरा दिला आहे. या बोगद्याला मंजुरी मिळाल्यास रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला मोठी गती मिळणार असल्याने, केंद्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आता कोकणवासीयांना लागली आहे.