Wednesday, November 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी हातखंबा येथे ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणारा टँकर निष्काळजीपणे चालविला; चालकाविरुद्ध गुन्हा

हातखंबा येथे ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणारा टँकर निष्काळजीपणे चालविला; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणारा गॅस टँकर निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबराव रंगराव देशमुख (वय ४९, रा. कळंबेश्वर, ता. मेहकर, जि. बुलढाणा) असे संशयित टॅन्कर चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २३) दुपारी पावणेतीनच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गालगत हातखंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उतारात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चालक हा जीओ गॅस कंपनीचा ज्वालाग्राही पदार्थाने भरलेला टँकर (क्र. एमएच ४३ वाय ५८१७) घेऊन निवळी ते कोल्हापूर असा प्रवास करत होता. मुंबई-गोवा महामार्गालगत हातखंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उतारावरून जात असताना त्याने टँकर निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवला. त्यामुळे अपघात झाला. टँकरमध्ये ज्वालाग्राही पदार्थ असल्याची माहिती असतानाही चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिस पाटील शर्वरी सनगरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.