सहा जणांविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने बौद्धवाडी येथे जुन्या वादातून एका ४० वर्षीय व्यक्तीला मारहाण करून जखमी केल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी समीर सीताराम जाधव (वय ४०, रा. ताम्हाने बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) यांच्या तक्रारीनुसार, ते घरी जात असताना संशयित आरोपींनी त्यांच्याशी वाद घालून मारहाण केली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करून हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
मारहाणीनंतर जखमी समीर जाधव यांना उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी व उपचारासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी शैलेश सदानंद जाधव, संतोष अनंत जाधव (पोलिस पाटील), मनोज महेंद्र जाधव, प्रतीक विजय जाधव, विजय सखाराम जाधव आणि शेखर जयराम जाधव (सर्व रा. ताम्हाने बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. जाधव करीत आहेत. गुन्ह्याची कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात पाठविण्यात आली आहेत. ताम्हाने परिसरातील या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









