दोन मुकादमांवर गुन्हा दाखल; घाणेखुट-दाभीळ परिसरातील प्रकार
खेड:- तालुक्यातील घाणेखुट व दाभीळ येथील चिरेखाणीवर मजुरीचे पैसे न देता मजुराकडून बळजबरीने काम करून घेतल्याचा आणि विरोध केल्यास मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन मुकादमांविरोधात खेड पोलीस ठाण्यात वेठबिगारीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकेश कल्लू बनवासी (वय ३३, मूळ रा. नया बाजार, जि. बनारस, उत्तर प्रदेश; सध्या रा. सुर्वेवाडी येथील चिरेखाण, घाणेखुट, ता. खेड) हे सप्टेंबर २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घाणेखुट व दाभीळ येथील चिरेखाणीवर काम करत होते. या कालावधीत मुकादम राम धनसिंग राठोड आणि भरत धनसिंग राठोड (दोन्ही मूळ रा. रामपूर, ता. सिंदगी, जि. विजापूर, कर्नाटक; सध्या रा. कातळवाडी, घाणेखुट, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी त्यांना मजुरीचे पैसे न देता बळजबरीने काम करण्यास भाग पाडले.
काम करण्यास विरोध केल्यानंतर दोन्ही मुकादमांनी फिर्यादी यांना वेळोवेळी हाताने मारहाण केली, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी मुकेश बनवासी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोटे पोलीस दूरक्षेत्राच्या आकस्मिक/नोंद क्र. १२१/२०२६ अन्वये २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.४२ वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६२/२०२६ नोंदवण्यात आला आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४६, ३५२, ३५१(२), ११५(२), ३(५) तसेच वेठबिगारी कायदा कलम १६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार कदम (ब.नं. १३९४) करीत आहेत.









