Saturday, November 28, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अलोरेसह कुंभार्ली येथे घरफोड्या; ४.२६ लाखांचा ऐवज लंपास

अलोरेसह कुंभार्ली येथे घरफोड्या; ४.२६ लाखांचा ऐवज लंपास


चोरट्यांनी चोरीनंतर दोन्ही घरांना लावले सारखेच नवीन कुलूप

चिपळूण:- तालुक्यातील अलोरे आणि कुंभार्ली येथील दोन बंद घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४ लाख २६ हजार २८० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दोन्ही घरांच्या दरवाज्यांना सारखेच नवीन कुलूप लावून पळ काढल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अलोरे येथील वरचीवाडी येथे राहणारे संजीव रघुनाथ चव्हाण (वय ३७) यांच्या घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने कोणत्यातरी हत्याराने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील दागिने आणि रोकड लंपास करून दरवाज्याला दुसरे नवीन कुलूप लावले.
त्याचप्रमाणे, कुंभार्ली गावातील नम्रता नंदकुमार आडविलकर यांच्या राहत्या घराचे कुलूपही अज्ञात चोरट्याने कापून आत प्रवेश करत चोरी केली आणि त्यांच्याही घराच्या दरवाज्याला सारखेच कुलूप लावले.
या घटनेत सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे किंमत रु. २,१०,०००, सोन्याच्या चार अंगठ्या अंदाजे किंमत रु. ९६,०००, सोन्याचा हार: अंदाजे किंमत रु. ६०,०००, सोन्याची टॉप्स जोडी अंदाजे किंमत रु. ३०,०००, सोन्याची रिंग जोडी अंदाजे किंमत रु. ६,०००, सोन्याची नथ अंदाजे किंमत रु. ३,०००, चांदीचा तुकडा व नाणे: रु. ४,८०० आणि गणपतीचे चित्र असलेले सुमारे १० ग्रॅम वजनाचे गोल नाणे
रोख रक्कम रु. १६,००० असा एकूण ४,२६,२८० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
याप्रकरणी संजीव रघुनाथ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २६ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३६ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चोरट्यांनी दोन्ही घरांना सारखेच कुलूप लावल्याने यामागे एकाच टोळीचा हात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, पुढील तपास सुरू आहे.