Friday, November 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शहरात पाणी संकटावर मात करण्यासाठी ‘एरिॲटर’ मोहीम

रत्नागिरी शहरात पाणी संकटावर मात करण्यासाठी ‘एरिॲटर’ मोहीम

प्रत्येक घरात मोफत दोन डिव्हाइस देण्याचा मानस;
रत्नागिरी नगरपरिषद, रोटरी क्लबच्या संयुक्त उपक्रम

रत्नागिरी:- शहराला भेडसावणाऱ्या संभाव्य पाणी संकटावर मात करण्यासाठी आणि जलसंधारणाच्या दृष्टीने रत्नागिरी नगरपरिषद आणि ‘रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पाऊल उचलण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत घरातील नळांना बसवण्यात येणारे ‘एरिॲटर’ हे पाण्याची बचत करणारे डिव्हाइस नागरिकांना विनामूल्य देण्याचा मानस असून, पहिल्या टप्प्यात प्रत्येक घरात दोन डिव्हाइस देण्याचे नियोजन आहे. ही माहिती नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हे छोटेखानी डिव्हाइस घरातील सिंक आणि बेसिनच्या नळांना सहज बसवता येते. हे बसवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून अवघ्या एका मिनिटात ते बसवले जाते. हात धुताना किंवा ब्रश करताना नळ सुरू राहिल्याने वाया जाणारे पाणी या डिव्हाइसमुळे रोखता येते. पाण्याचा दाब किंवा फ्लो कमी न करता पाण्याचा अपव्यय टाळला जातो, ज्यामुळे सुमारे ५० ते ७० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत साध्य होऊ शकते.

सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर रोटरी क्लबच्या माध्यमातून आलेली डिव्हाइस शासकीय इमारतींमध्ये बसवण्यात येणार आहेत. तसेच नगरपरिषदेच्या इमारतीतील बेसिनवर डेमोसाठी हे डिव्हाइस बसवण्यात आले आहे, जेणेकरून नागरिकांना त्यातील फरक प्रत्यक्ष अनुभवता येईल.

पुढील टप्प्यासाठी सुमारे १६,००० डिव्हाइस मागवण्यात येणार आहेत. प्रभागाच्या संख्येनुसार प्रत्येक प्रभागाला साधारण १,००० डिव्हाइस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. या संपूर्ण उपक्रमाचा विषय आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून, सभेची मंजुरी मिळाल्यानंतर वाटप व बसवण्याची प्रक्रिया गतीने राबवली जाईल.

नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, पाणी सभापती निमेष नायर, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष मनीष नलावडे यांच्यासह नगरसेवक बाळू साळवी, सौ. पाटील आणि सौ. मानसी करमरकर यांची प्रमुख उपस्थिती होती