आंबडस खोतवाडी येथील घटना
खेड:- तालुक्यातील आंबडस खोतवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप आणि कोयंडा कोणत्यातरी हत्याराने कापून घरात प्रवेश करत तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबडस खोतवाडी येथील रहिवासी अशोक रघुनाथ जाधव (वय ५८, व्यवसाय नोकरी) यांचे घर १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७ वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत बंद होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक आणि कोयंडा कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचा लॉकर फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये १ लाख २० हजार रुपये किमतीचा १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, १ लाख २० हजार रुपये किमतीचा १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, १ लाख १० हजार रुपये किमतीची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची पिळ्याची चैन व षटकोन पान, ७० हजार रुपये किमतीची ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वाघनख, प्रत्येकी ४० हजार रुपये किमतीचे व ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले, कानपट्टी वेल आणि नक्षीदार गोल रिंग जोड, तसेच २५ हजार रुपये किमतीचे २.०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदामपान यांचा समावेश आहे. यासोबतच प्रत्येकी २ हजार ५०० रुपये किमतीचे २५ ग्रॅम वजनाचा चांदीचा कमरेचा छल्ला आणि २५ ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी, तसेच ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील २० हजार रुपये रोख रक्कमही चोरट्यांनी लांबवली आहे.
घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशोक जाधव यांनी २२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.२५ वाजता खेड पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) (तसेच जुन्या भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०) अन्वये गुन्हा नोंदवला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी खेड पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.









