Tuesday, November 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रस्त्याच्या वादातून तिघांवर फावड्याने हल्ला

रस्त्याच्या वादातून तिघांवर फावड्याने हल्ला

टेरव तांदळेवाडीतील घटना; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूण:- येण्याजाण्याच्या मार्गावरून सुरू असलेल्या वादातून एका व्यक्तीने रस्त्याचे काम करणाऱ्या तिघांवर फावड्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील टेरव तांदळेवाडी येथे घडली आहे. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरव तांदळेवाडी येथील रहिवासी शिवाजी नारायण म्हाळीम (वय ४५, व्यवसाय वेल्डर) हे राजेंद्र म्हाळीम आणि काशीराम म्हाळीम यांच्यासोबत परिसरात रस्त्याचे काम करत होते. त्यावेळी त्याच वाडीतील रहिवासी संजय सिताराम म्हाळीम (वय ४७) हा तिथे आला आणि ‘तुम्ही अंगणात रोड का बांधताय, तो आमच्या येण्याजाण्याचा मार्ग आहे,’ असे म्हणत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. या वादावादीचे रूपांतर हाणामारीत होऊन संजय म्हाळीम याने तिथेच पडलेले फावडे उचलले आणि शिवाजी म्हाळीम, राजेंद्र म्हाळीम व काशीराम म्हाळीम यांच्या हातावर, पायावर आणि दंडावर मारून त्यांना दुखापत केली.

या हल्ल्यात जखमी झालेले शिवाजी म्हाळीम यांना उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या (एमएलसी) आधारे पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष शिवाजी म्हाळीम यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यांच्या तक्रारीवरून २२ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३५ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी संजय सिताराम म्हाळीम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.