Tuesday, November 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी स्त्री भ्रुण हत्या प्रकरणी डॉक्टरसह तिघांवर गुन्हा

स्त्री भ्रुण हत्या प्रकरणी डॉक्टरसह तिघांवर गुन्हा

दोघांना २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

संगमेश्वर:- तालुक्यातील साखरपा येथे करवीर तालुक्यातील एका दांपत्याने बेकायदेशीर स्त्री भ्रुण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी साखरप्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरसह संबंधित दांपत्यावर देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर आणि पती या दोघांना सोमवारी अटक करण्यात आली असून त्यांना सायंकाळी देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने दोघांना २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.देवरुख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील एक दांपत्य १९ तारखेला गर्भपातासाठी साखरपा येथील खासगी प्रॅक्टिस करणारे डॉ. विजय नारकर यांच्याकडे आले होते. १६ ते १८ आठवड्यांच्या स्त्रीभ्रुणाचा गर्भपात करताना महिलेला तीव्र रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे घाबरलेल्या डॉक्टर आणि दांपत्याने पुढील उपचारासाठी महिलेला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले.

तेथील स्त्रीरोग तज्ञांनी तपासणी केल्यानंतर हा स्त्री भ्रुण हत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. खात्री पटल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी साखरपा येथील डॉक्टर आणि दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा स्पष्ट अहवाल दिला.

या अहवालाच्या आधारे देवरुख पोलीस स्थानकात डॉक्टरसह पती-पत्नीविरुद्ध भारतीय न्याय संहिता ८८, १२५ (ब) तसेच गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे अधिनियम १९९४ च्या कलम ४, ५ (२), २३ (१), २३ (३) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव करत आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लांजा उपविभागाचे उपअधीक्षक सुरेश कदम यांनी देवरुख पोलीस स्थानकाला भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. संबंधित डॉक्टरवर यापूर्वी २०२४ मध्ये करवीर येथे स्त्री भ्रुण हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती कदम यांनी दिली. करवीर तालुक्यातील दांपत्य थेट साखरपा येथे आल्याने या ठिकाणी यापूर्वीही असे प्रकार घडले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.