रत्नागिरी:- सामाईक जमिनीच्या व्यवहारावरून वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने ६७ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोणवली-कुळेवाडी (ता. गुहागर) येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी मृत वृद्धाने आरोपींकडून मिळालेल्या धमक्यांबाबत चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत महादेव कुळे (वय ६७, रा. गोणवली, कुळेवाडी, ता. गुहागर) यांनी ७ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजण्यापूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांचा मुलगा नरेश यशवंत कुळे (वय ३९, सध्या रा. विरार, मुंबई) यांनी शनिवारी (ता. २१) रात्री गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गोणवली येथील गट क्रमांक ३४३, २८१, २८९ आणि २४३ मधील सामाईक जमिनीच्या व्यवहारावरून पराग कोळवणकर (रा. पडवे), संतोष जैतापकर (रा. नरवण), संतोष आग्रे (रा. तळवली) आणि दीपक पालशेतकर (रा. पालशेत) हे चौघे यशवंत कुळे यांच्याकडे वारंवार तगादा लावत होते. ही जमीन आपल्या नावावर करून देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता, असा आरोप फिर्यादीने केला आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये संतोष आग्रे आणि पराग कोळवणकर यांनी गोणवली येथील यशवंत कुळे यांच्या घरी जाऊन जमिनीच्या व्यवहारावरून त्यांच्यावर दबाव टाकला होता. तसेच त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींकडून दिलेल्या धमक्यांबाबत यशवंत कुळे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमुळे वडिलांवर दबाव आणला जात असल्याची खात्री झाल्याचे नरेश कुळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीनुसार गुहागर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गुहागर पोलिस करीत आहेत









