गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम
रत्नागिरी:- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर २२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. या कालावधीत सहा गाड्या मार्गात नियंत्रित करण्यात येणार असून, दोन गाड्या निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुटतील.
मंगळुरू-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (१२१३४) ही २२ ते २८ नोव्हेंबरदरम्यान आपटा स्थानकात ५० मिनिटे, तर मडगाव-मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस (२०११२) ही याच कालावधीत सोमटणे स्थानकात १० मिनिटे नियंत्रित केली जाणार . तिरुअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस (२२११४) ही २३ नोव्हेंबरला, एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस (२२१४९) ही २४ आणि २७ नोव्हेंबरला, तर तिरुअनंतपुरम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२२६५३) ही २८ नोव्हेंबरला आपटा येथे १०९ मिनिटे नियंत्रित राहणार आहे. एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२२६५५) ही २५ नोव्हेंबरला ६० मिनिटे नियंत्रित केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस (११०९९) ही २४, २७, २८ आणि २९ नोव्हेंबरला, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी सुपरफास्ट एक्स्प्रेस (२२११५) ही २६ नोव्हेंबरला दोन तास उशिराने सुटणार आहे. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.









