एका तरुणावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील फगरवठार पोलीस लाईन परिसरामध्ये नंबर प्लेट नसलेल्या संशयास्पद पल्सर मोटारसायकलवरून फिरणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल सुरेश जगताप (वय २४ वर्षे, व्यवसाय-भंगार खरेदी-विक्री/फिरस्ते, रा. स्टेट बँक कॉलनी, साळवी स्टॉप झोपडपट्टी, ता. जि. रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भालचंद्र दिलीप मयेकर हे फगरवठार परिसरात कर्तव्यावर असताना त्यांना एका काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलला पुढील नंबर प्लेट नसल्याचे निदर्शनास आले. संशय बळावल्याने त्यांनी चालकाला थांबवून चौकशी केली. मात्र, चालकाकडे वाहनाच्या मालकी हक्काबाबत कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत, तसेच त्याने दिलेल्या उत्तरांमध्ये मोठी विसंगती दिसून आली.
ताब्यातील दुचाकी ही चोरीची किंवा फसवणूक करून आणलेली असावी असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी सुमारे २५ हजार रुपये किमतीची १५० सीसी क्षमतेची काळ्या रंगाची पल्सर दुचाकी (गाडी क्र. एमएच ०८ यु ९४६३) जप्त केली आहे. पोलीस हवालदार भालचंद्र मयेकर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अमोल जगताप याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, ही दुचाकी नेमकी कुठून आणली याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.









