Monday, November 23, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कपडे आणायला गेलेल्या २४ वर्षीय तरुणीचे अपहरण

कपडे आणायला गेलेल्या २४ वर्षीय तरुणीचे अपहरण

दापोली पोलिसांत गुन्हा दाखल

दापोली:- आंबवली येथे कपडे आणण्यासाठी जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना दापोली तालुक्यातील आसद तुळशीमोहल्ला येथे घडली आहे. तिला कोणीतरी अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत तिच्या आईने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.

ही घटना शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास आसद तुळशीमोहल्ला, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे घडली. अफशीन कलंदर ऐनरकर (वय २४ वर्षे, रा. आसद तुळशीमोहल्ला, ता. दापोली) असे अपहृत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्वरी कलंदर ऐनरकर (वय ४५ वर्षे, रा. आसद तुळशीमोहल्ला, ता. दापोली) यांची मुलगी अफशीन ही शुक्रवारी सकाळी आंबवली येथे कपडे आणायला जाते असे सांगून घरातून निघून गेली होती. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी आंबवली गावात जाऊन तिचा शोध घेतला. तेथे ती आढळून न आल्याने नातेवाईक, शेजारी व आजूबाजूच्या परिसरात तिचा कसून शोध घेण्यात आला.

सर्वत्र शोध घेऊनही अफशीन मिळून न आल्याने तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची खात्री फिर्यादीची झाली. त्यानुसार अन्वरी ऐनरकर यांनी शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.२७ वाजता दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याप्रकरणी पोलिसांनी गु.र.नं. २५७/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.