Tuesday, October 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी लाचखोर डॉ. मदार यांच्यावरील निलंबन प्रस्ताव प्रलंबितच

लाचखोर डॉ. मदार यांच्यावरील निलंबन प्रस्ताव प्रलंबितच

२५ दिवसांनंतरही प्रशासनाची अनास्था

रत्नागिरी:- कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडून २५ दिवस उलटले तरी, त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या विलंबामुळे प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कामथे उपजिल्हा रुग्णालयात गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट देण्याच्या बदल्यात एका गरोदर महिलेकडे ४,५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. कांचन मदार यांच्यावर कारवाई केली होती. ३ जून रोजी त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईने संपूर्ण जिल्हा आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली होती.

डॉ. मदार या वर्ग-२ (अ) गटातील वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्या निलंबनाचे अधिकार आरोग्य उपसंचालकांकडे असल्याने, जिल्हा प्रशासनाकडून हा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मात्र, २३ दिवस उलटूनही उपसंचालक कार्यालयाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

एका गंभीर गुन्ह्यात नाव आलेल्या आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या डॉक्टरवर निलंबनाची कारवाई तत्काळ होणे अपेक्षित असताना, प्रक्रियेत होत असलेल्या या विलंबामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणावर आरोग्य विभाग काय भूमिका घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.