Friday, May 22, 2026
spot_img
Home रत्नागिरी जुना राग मनात धरून घरात घुसून धमकी; आरे येथे चौघांवर गुन्हा दाखल

जुना राग मनात धरून घरात घुसून धमकी; आरे येथे चौघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- पूर्वी झालेल्या वादाचा आणि पोलीस तक्रारीचा राग मनात धरून आरे गावातील कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील आरे येथे १५ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी प्रतीक्षा प्रकाश कदम (वय ५८, रा. आरे बसणी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शेजारी राहणारे साहिल राम शिवलकर (वय २५), सागर राम शिवलकर (वय २५), अस्मि अक्षय शिवलकर (वय ३५) आणि राम दत्ताराम शिवलकर (वय ५५, सर्व रा. आरे बसणी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२४(४), ३५१(२), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारदार प्रतीक्षा कदम या १५ मे रोजी रात्री घराच्या पाठीमागे भांडी घासत होत्या. यावेळी शेजारी राहणाऱ्या साहिल आणि सागर शिवलकर यांनी तिथे येत जुन्या वादावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तुझा मुलगा पंकज याला बाहेर काढ, त्याला ठार मारायचे आहे,” अशी धमकी त्यांनी दिली. या प्रकारामुळे घाबरून प्रतीक्षा कदम या घरात पळून जात असताना आणि दरवाजा लावत असताना झालेल्या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची चैन तुटली.

दरम्यान, भांडणाचा आवाज ऐकून प्रतीक्षा यांचे पती प्रकाश आणि मुलगा पंकज यांनी पुढचा दरवाजा बंद करून घेतला. त्यावेळी गैरतक्रारदार अस्मि आणि राम शिवलकर यांनीही घराबाहेरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

मागील वर्षी २१ ऑक्टोबर २०२५ रोजी तक्रारदार यांचा मुलगा पंकज कदम हा त्याच्या मित्रासोबत आरे ब्रिजखाली ‘काळवं’ (कालवे) काढण्यासाठी गेला होता. त्याचा राग साहिल आणि समीर शिवलकर यांना आला होता व त्यांनी पंकजला शिवीगाळ केली होती. त्या प्रकरणी पंकजने पोलिसांत तक्रार दिली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून शिवलकर कुटुंबीयांनी कदम यांच्या घराच्या पाठीमागील खिडकीजवळ येत पंकजला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार शिवलकर यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील तपास आणि एन.सी. पेट्रोलिंग पोलीस हवालदार महाडिक करत आहेत.