Thursday, November 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी हवाई हल्ल्याच्या आपत्तीवर रत्नागिरी नगरपरिषद येथे मॉक ड्रिल

हवाई हल्ल्याच्या आपत्तीवर रत्नागिरी नगरपरिषद येथे मॉक ड्रिल

मार्गदर्शन, सरावाच्या माध्यमातून काम अधिक प्रभावीपणे: नगराध्यक्ष सुर्वे

रत्नागिरी:- शत्रूच्या संभाव्य हवाई हल्ल्यामुळे जिल्ह्याच्या मुख्य प्रशासकीय केंद्रावर व दाट लोकवस्तीच्या भागात उद्भवणाऱ्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद येथे गृह विभाग नागरी संरक्षण दलाच्यावतीने मॉक ड्रिलच्या शृंखलेतील तिसरी मॉक ड्रिल आज आयोजित करण्यात आली होती. या कार्यवाहीची माहिती निवृत्त लेफ्टनंट कर्नल जिल्हा उपनियंत्रक प्रशांत चतूर यांनी दिली. प्रत्यक्ष आपत्कालीन किंवा एखादी घटना घडल्यानंतर परिस्थिती हाताळणे सोपे नसते; मात्र योग्य मार्गदर्शन आणि सरावाच्या माध्यमातून काम अधिक प्रभावीपणे करता येते, असे मार्गदर्शन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी यावेळी केले.

नगरपरिषदेत बॉम्ब पडल्याची घटना घडल्यानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या. यावेळी उद्भवणाऱ्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी योग्य नियोजन केले होते. याबाबत माहिती देताना श्री. चतूर म्हणाले, ही मॉक ड्रिल दोन भागांत पार पाडण्यात आली. पहिल्या भागातील दिवसाची कार्यवाही सुमारे ४५ मिनिटांत पूर्ण झाली, तर सूर्यास्तानंतर ब्लॅक आऊट सराव अभ्यास करण्यात आला.

या सरावात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, क्यूआरटी, डॉग स्क्वाड, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक, ‘माय भारत’, एनसीसीचे विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते. हवाई हल्ल्यामुळे इमारतीचे नुकसान झाल्यास मोठी जीवितहानी टाळणे, संभाव्य स्फोट न झालेल्या बॉम्बबाबत दक्षता घेणे आणि आत अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे याचा समावेश होता. जखमींना वैद्यकीय ‘गोल्डन रूल’नुसार तत्काळ प्रथमोपचार व सीपीआर देऊन वेळेत जवळच्या रुग्णालयात हलवण्याचा सराव करण्यात आला.
केंद्रीय गृह दल व महाराष्ट्र गृह विभागाच्या सूचनेनुसार, गेल्या वर्षीच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्र सरकारने ‘ऑपरेशन अभ्यास’ सुरू केले. मध्य प्रदेशातील इंदोर येथील आयआयएममध्ये झालेल्या डीजीपी आणि आयजीपी कॉन्फरन्समध्ये नागरिकांना सतर्क ठेवण्यासाठी वर्षातून दोनदा ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रत्नागिरीतील ही तिसरी मॉक ड्रिल नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली असली, तरी अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी समन्वय आणि सराव महत्त्वाचा असल्याचे प्रशांत चतूर यांनी नमूद केले.

सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती—विशेषतः इस्रायल-इराण किंवा अमेरिका-इराण संघर्ष, होर्मुजच्या खाडीतील स्थिती, सागरी व्यापार मार्ग आणि ५० नॉटिकल मैलांच्या पुढे शत्रूच्या जहाजांकडून होणारी संभाव्य रेकी तसेच क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्यांचा धोका लक्षात घेता, पुढील काळात औद्योगिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. जेणेकरून औद्योगिक क्षेत्राची संभाव्य हानी आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेच्या ‘ग्रोथ इंजिन’वर होणारे परिणाम टाळता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

योग्य मार्गदर्शन, सरावाच्या माध्यमातून काम अधिक प्रभावीपणे: नगराध्यक्ष सुर्वे

प्रत्यक्ष आपत्कालीन किंवा एखादी घटना घडल्यानंतर परिस्थिती हाताळणे सोपे नसते; मात्र योग्य मार्गदर्शन आणि सरावाच्या माध्यमातून काम अधिक प्रभावीपणे करता येते, असे मार्गदर्शन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी यावेळी केले. प्रात्यक्षिक व मार्गदर्शनाची दिशा: सराव अभ्यासादरम्यान देण्यात आलेल्या मार्गदर्शनानुसार आणि दाखवण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाच्या दिशेने सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.