Sunday, November 29, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ताम्हाणे बौद्धवाडीत किरकोळ वादातून मारहाण

ताम्हाणे बौद्धवाडीत किरकोळ वादातून मारहाण

लोखंडी रॉडने हल्ला,पोलीस पाटलासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

देवरुख:- रिक्षाला साईड न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे बौद्धवाडी येथे २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत समीर सिताराम जाधव (वय ४०, रा. ताम्हाणे बौद्धवाडी) हे जखमी झाले असून, लोखंडी रॉडने डोक्यावर व डाव्या कुशीवर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर जाधव हे २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी देवरुख बाजारपेठेतून खरेदी करून अमर रामचंद्र सावंत यांच्या मालकीच्या रिक्षाने घरी परतत होते. यावेळी ताम्हाणे बौद्धवाडी येथे आरोपी क्रमांक एक शैलेश सदानंद जाधव याने रिक्षाला साईड दिली नसल्याचा आरोप आहे. घरी पोहोचल्यानंतर खरेदीच्या पिशव्या ठेऊन जाधव हे संबंधित व्यक्तीला याबाबत विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी शैलेश जाधव हा प्रतिक विजय जाधव याच्या घराच्या गेटसमोर भेटला. रिक्षाला साईड का दिली नाही, अशी विचारणा केली असता त्याने लोखंडी रॉडने डोक्यात व डाव्या कुशीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारानंतर जखमी समीर जाधव हे आपल्या गोठ्यातून लोखंडी टिकाव आणून प्रतिक जाधव याच्या घराच्या कंपाउंडचे चिऱ्याचे बांधकाम तोडू लागले. त्यावेळी संतोष आनंत जाधव (वय ३८), मनोज महेंद्र जाधव (वय ४३), प्रतिक विजय जाधव (वय ३४), विजय सखाराम जाधव (वय ५९) आणि शेखर जयराम जाधव (वय ५०) हे घटनास्थळी आले. त्यांनी बेकायदा जमाव करून आपल्याला मारण्यासाठी अंगावर धावून आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. यावेळी समीर जाधव यांच्या पत्नी अंजली जाधव यांनी त्यांना तेथून बाजूला नेत वाडीतील अजित सावंत यांच्या चारचाकी वाहनातून उपचारासाठी देवरुख येथे आणले.

या प्रकरणी समीर जाधव यांनी ग्रामीण रुग्णालय, देवरुख येथे उपचार घेतल्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी दिलेल्या जबाबावरून देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १८९(२), १९० आणि १३१ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १८३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शैलेश सदानंद जाधव, संतोष आनंत जाधव, मनोज महेंद्र जाधव, प्रतिक विजय जाधव, विजय सखाराम जाधव आणि शेखर जयराम जाधव या सहा जणांचा समावेश आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करीत आहेत.