राजापूर:- तालुक्यातील कोंडये खालचीवाडी येथील एक २८ वर्षीय तरुण गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, त्याचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निनाद किशोर शिवगण (वय २८, रा. कोंडये खालचीवाडी, ता. राजापूर) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निनाद हा २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंडये खालचीवाडी येथील आपल्या राहत्या घरातून पत्नी तेजल शिवगण हिला “बाहेर जाऊन येतो” असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेतला असता त्याचा कोठेही थांगपत्ता लागला नाही.
अखेर, कोणीतरी अज्ञात इसमाने गुप्तपणे आणि बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केल्याची तक्रार वडील किशोर गणपत शिवगण (वय ५५, व्यवसाय शेती, रा. कोंडये खालचीवाडी) यांनी पोलिसांत दिली.
या फिर्यादीवरून २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३८ वाजता अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांकडून बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.









