Thursday, November 26, 2026
spot_img
Home लांजा अंजणारी येथे ठाकरे सेनेचे रस्ता रोको आंदोलन

अंजणारी येथे ठाकरे सेनेचे रस्ता रोको आंदोलन

अवघड वळणावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी; वाहतूक विस्कळीत

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी पुलाच्या परिसरात सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी (दि. २५) अंजणारी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

​अंजणारी पुलाच्या आधी असलेल्या अवघड वळणामुळे गेल्या दोन महिन्यांत अनेक भीषण अपघात घडले असून, या दुर्घटनेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सातत्याने घडणाऱ्या या अपघातांच्या मालिकेमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन अपघात रोखण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत प्रशासनाचा निषेध नोंदवला.

​या रस्ता रोको आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच महामार्ग विभाग आणि परिवहन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.

​अंजणारी पुलाजवळील तीव्र वळण, वाहनांचा वेग आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत संबंधित विभागांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला.