लांजा पोलिसांत चालकावर गुन्हा दाखल
लांजा:- शहरातील उड्डाणपुलावर टाटा अल्ट्रोज कारला समोरासमोर धडक देत आतील पाच प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हा अपघात १७ नोव्हेंबर रोजी झाला होता.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील रहिवासी असलेले प्रसाद रघुनाथ गुरव (वय ३२, रा.नाचणे, श्रीराम नगर) हे १७ नोव्हेंबर रोजी आपल्या ताब्यातील अल्ट्रोज कारने (एमएच.०८.बीई.१०६७) राजापूर येथून रत्नागिरी येथे जात असताना लांजा शहरात उड्डाणपुलावर त्यांच्या कारला महिंद्रा स्कॉर्पिओ या कारने समोरासमोर धडक दिली होती. ही स्कॉर्पिओ कार क्रमांक (जीजे.०२.डीपी.९९५९) कृष्णकुमार हिराराम रबारी (वय २३, रा.हिरा रामजी नासोली, ता.भिनमाल, जि.जालोर, रा.राजस्थान) हे चालवीत होते.
या अपघातात उड्डाण पुलावरील रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता गाडी हयगयीने अविचाराने चालवून आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या जीविताला धोका उत्पन्न होईल अशाप्रकारे स्कॉर्पिओ कार चालवून टाटा अल्ट्रोज कारला धडक देत कालचालक याच्या डोक्याला, कमरेला, पायाला गंभीर व किरकोळ दुखापती तसेच शेजारी बसलेले रेखा गुरव हिच्या पायाला तसेच शितल गुरव, सुरेंद्र गुरव आणि सुजाता गुरव यांच्या गंभीर आणि किरकोळ दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी महिंद्रा स्कॉर्पिओ चालक कृष्णकुमार देवासी याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब), मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे तसेच भा.द.वि.क २७९, ३३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









