Wednesday, November 25, 2026
spot_img
Home गुन्हेगारी महिलेच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जामीन

महिलेच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जामीन

संगमेश्वर आसावे येथील घटना

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील आसावे येथे ५५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. विनोद भिकू मुदगल (३८, रा. आसावे कुणबीवाडी ता. संगमेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. यापूर्वी रत्नागिरी सत्र न्यायालयाने विनोद याला १० वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती.

गुन्ह्यातील माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील आसावे येथील रहिवासी साधना सुधाकर मुळये (५५) व आरोपी विनोद’ मुदगल यांच्यात काही कारणातून वाद झाला होता. १४ मे २०२२ रोजी विनोद हा तक्रारदार राहत असलेल्या घरी आला होता. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार या घरी एकट्याच असताना आरोपी त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. मुळ्ये यांनी विनोद याला तू इथे का आलास, तुझे इथे काय काम आहे अशी विचारणा केला. याचा राग आल्याने विनोद याने मुळ्य यांची अचानक मान आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. विनोद याने जोराने गळा आवळल्याने तक्रारदाराच्या तोंडातून रक्त येऊ लागले. तसेच त्या जागीच बेशुद्ध होऊन पडल्या. काही वेळाने तक्रारदार शुद्धीवर आल्या असता त्याचा गळा दुखत होता. मानेवर गळा आवळल्याच्या खुणा व नखांनी ओरबडलेले दिसून आले.

संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विनोद मुदगल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. विनोद याने उच्च न्यायालयात दाद मागितली. विनोद याच्यावतीने अॅड अभिजीत कदम यांनी काम पाहिले.