Wednesday, November 25, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरीत बांधकामाच्या कामातून ८० लाखांची फसवणूक

रत्नागिरीत बांधकामाच्या कामातून ८० लाखांची फसवणूक

मेरिट अ‍ॅकॉमोडेशनमधील फिनिशिंग वर्कची बिले थकवली; नाशिकच्या कंपनीच्या मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- कोस्टगार्डच्या मेरिट अ‍ॅकॉमोडेशन इमारतीतील फिनिशिंग वर्क आणि अन्य बांधकामाची कामे करून घेतल्यानंतर त्याची बिले न देता ठेकेदाराची ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक येथील कंपनीच्या मालकासह चौघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पुणे येथील इंटिरिअर डिझायनर व कंत्राटदार सौ. अश्विनी सुनील आंबेकर (वय ३४, रा. यश अपार्टमेंट, वारजे, पुणे) यांनी सोमवारी (ता. २३) नोव्हेंबरला रात्री पावणे अकरा वाजता दिली. त्यानुसार नाशिक येथील मेसर्स प्राड इंन्फ्रा कंपनीचे मालक दिगंबर आनंदराव पिंगळे, प्रकल्प व्यवस्थापक श्रीधर सुरेंद्र लोंढे, प्रकल्प समन्वयक दिनेश नाडगोडे आणि राजू खेतावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोस्टगार्ड रत्नागिरी येथील मेरिट अ‍ॅकॉमोडेशन, झाडगाव येथील बिल्डिंग क्रमांक ७ मधील फिनिशिंग वर्कचे काम फिर्यादी यांनी करारानुसार पूर्ण केले होते. या कामाचे अंतिम बिल ५५ लाख १२ हजार ५०५ रुपये झाले होते. तसेच कोस्टगार्डच्या मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसच्या ओटीबीएम गॅरेजमधील आरसीसी स्लॅबच्या लेबर वर्कचे जीएसटीसह २५ लाख ५ हजार ३३१ रुपयांचे बिल थकीत होते. अशा दोन्ही कामांची एकूण ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची रक्कम आरोपींकडून देणे बाकी होती.
दरम्यान, बिल्डिंग क्रमांक ७ व ८ मधील फिनिशिंग वर्कचे काम पूर्ण होण्यापूर्वीच संशयित दिगंबर पिंगळे यांनी दुसऱ्या कन्स्ट्रक्शन फर्मसोबत करार केला. हा करार करताना फिर्यादी यांच्याशी झालेला पूर्वीचा करार रद्द केला नाही. तसेच दुसऱ्या संस्थेला फिर्यादी यांची थकीत बिले आणि सुरू असलेल्या वादाची माहितीही दिली नाही. फिर्यादी यांची संमती न घेता दुसरा करार करण्यात आला. या करारात फिर्यादी यांना देय असलेल्या रकमेचा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता.
काम पूर्ण होण्यापूर्वीच दुसऱ्या संस्थेला वर्कऑर्डर देऊन फिर्यादी यांची ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची रक्कम बुडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फिर्यादी सौ. अश्विनी आंबेकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.