Tuesday, November 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी जि.प.च्या 15 व्या वित्त आयोग विकास आराखड्याच्या चौकशीचे आदेश

जि.प.च्या 15 व्या वित्त आयोग विकास आराखड्याच्या चौकशीचे आदेश

विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांची तक्रार
15 दिवसात अहवाल देण्याचे निर्देश

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाचा विकास आराखडा मंजूर करताना प्रशासनाने शासन निर्णयाचे उल्लंघन करून विरोधी पक्षाच्या सदस्यांना अंधारात ठेवण्यात आले. आराखडा मंजूरी प्रक्रियेत पारदर्शकता नाही ती आणण्याची आणि सदस्य म्हणून आम्हाला समान न्याय देण्यात आलेला नाही तो देण्यात यावा. अन्याथा आमचा या आराखडा मंजूरीला विरोध राहिल, अशी लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे उबाठाचे विरोधीपक्षनेते विक्रांत जाधव यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. तक्रारीवरून कोकण विभागाच्या अपर आयुक्तांनी (विकास) चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून १५ दिवसांत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

ग्रामविकास विभागाच्या १ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार, १५ व्या वित्त आयोगाचा प्रारूप विकास आराखडा तयार झाल्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत त्याची छाननी होणे आणि परिशिष्ट ६ मधील नमुन्यानुसार तो सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, ३० जून २०२६ ला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत परिशिष्ट ६ नुसार कोणताही आराखडा व कामांची यादी सदस्यांसमोर न ठेवताच २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांच्या निधीला परस्पर मंजुरी देण्यात आल्याचे श्री. जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच, १ सप्टेंबर २०२६ च्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तातही परिशिष्ट ६ चा समावेश नसल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करत कामकाज रेटून नेल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. यासंदर्भात सभागृहात व सभागृहाबाहेर वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

खेड पंचायत समितीतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही निधी मिळत नसल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, मात्र त्यांनाही न्याय मिळाला नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात समन्वय राखण्यात व सर्वांना समान न्याय देण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी अपयशी ठरत असल्याची खंत व्यक्त करत, यापुढे विरोधी सदस्यांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक पद्धतीने आराखडे मंजूर करावेत, अशी मागणी जाधव यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे २ ऑक्टोबर २०२६ दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. याबाबत आज विक्रांत जाधव त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अधिकृतपणे हे पत्र देऊन माहिती दिली.

सर्वसाधारण सभेसमोर कोणती कामे आराखड्यात समाविष्ट केली जाणार आहेत, याची माहिती न देताच कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विक्रांत जाधव यांनी केलेल्या तक्रारीत आहे. सभागृहात व सभागृहाबाहेर सातत्याने चुकीच्या कामकाजाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लक्ष वेधूनही अद्याप योग्य उत्तर मिळाले नसल्याचे तसेच विरोधी पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. खेड पंचायत समितीतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निधी न मिळण्याबाबत तक्रार करूनही समाधानकारक न्याय मिळालेला नाही. आराखडे नियमित करून सर्वसमावेशक व समान न्याय मिळावा, अशी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागाचे अपर आयुक्त (विकास) डॉ. माणिक दिवे यांनी २८ ऑक्टोबर २०२६ ला स्वाक्षरी केलेल्या पत्राद्वारे तक्रारीतील मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करून नियमोचित कारवाई करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.