Wednesday, November 25, 2026
spot_img
Home संगमेश्वर देवरूखमध्ये पिग्मी एजंट महिलेची आत्महत्या

देवरूखमध्ये पिग्मी एजंट महिलेची आत्महत्या

देवरूख:- शहरातील केशवसृष्टी परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. २३) दुपारी उघडकीस आली. सरिता संदेश देवळे (वय ४४, रा. केशवसृष्टी, देवरूख; मूळ रा. करंबेळे) असे मृत महिलेचे नाव आहे.

सरिता देवळे यांचे पती संदेश देवळे यांचा देवरूख शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे, तर सरिता या गेल्या अनेक वर्षांपासून एका पतसंस्थेच्या पिग्मी एजंट म्हणून कार्यरत होत्या. सोमवारी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्यांनी गळफास लावून आपले जीवन संपवले. दुपारी संदेश देवळे हे दुकान बंद करून घरी परतले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी व पंचनामा केला. सरिता यांना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयातच त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेचा अधिक तपास देवरूख पोलीस करत आहेत.