Saturday, November 21, 2026
spot_img
Home संगमेश्वर राजवाडी येथे वृद्धाला दुचाकीची जोरदार धडक

राजवाडी येथे वृद्धाला दुचाकीची जोरदार धडक

संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील राजवाडी येथील केदारनाथ मंदिराजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघात घडला आहे. या धडकेत ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असून, शंकर गणपत गुरव (वय ६५, रा. राजवाडी गुरववाडी, ता. संगमेश्वर) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. तर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या संजय नंदकुमार शिगवण (वय ४७, रा. चिपळूण शंकरवाडी, ता. चिपळूण) या दुचाकीस्वाराविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडला. फिर्यादी शंकर गुरव हे राजवाडी येथील मनोज किंजळकर यांच्या हॉटेलमधून चहा पिऊन बाहेर पडले होते आणि मुंबई-गोवा महामार्गाचा रस्ता ओलांडून समोरच्या बाजूला असलेल्या केदारनाथ मंदिराकडे जात होते. याच वेळी चिपळूण बाजूकडून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या होंडा शाईन मोटारसायकलवरील चालक संजय शिगवण याने आपली दुचाकी अतिशय भरधाव वेगात आणि बेदरकारपणे चालवत आणून शंकर गुरव यांना जोराची ठोकर दिली.

या धडकेत शंकर गुरव हे रस्त्यावर कोसळल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. घटनेनंतर १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सव्वासात वाजता शंकर गुरव यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १५१/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ आणि १२५ (अ) प्रमाणे दुचाकीचालक संजय शिगवण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.