दोघांना पोलीस कोठडी
राजापूर:- आपल्या काकांकडे कामासाठी असलेल्या २२ वर्षीय मतिमंद मुलीवर तीन जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी त्या पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून राजापूर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. दरम्यान, ती पीडित तरुणी दोन महिन्याची गर्भवती असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या कालावधीत या तिघांनी अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे. काशिनाथ बसान्ना गंगाशेट्टी (४७, मूळ वडावगी, विजापूर, कर्नाटक, सध्या हातिवले) व वैभव विलास राऊत (२६, आंगले, ता. राजापूर) अशी दोन संशयितांची नावे असून अल्पवयीन मुलगा या पीडितेच्या नातेसंबंधातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडित तरुणी बहिणीकडे राहण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिची प्रकृती बिघडल्याने उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता ती गर्भवती असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर मानसोपचार तज्ज्ञांच्या समक्ष घेतलेल्या जबाबाबत त्या पीडित तरुणीने या तीन जणांनी तिच्याशी वेगवेगळ्या ठिकाणी शरीरसंबध ठेवल्याचे सांगितले. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दोन संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ नोव्हेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन मुलाच्या पालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याला बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील अधिक तपास करत आहेत.









