Saturday, November 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी नाखरे येथील भामट्याचा सांगलीत धुमाकूळ

नाखरे येथील भामट्याचा सांगलीत धुमाकूळ

वकिल बनून सवाष्ण पूजेच्या नावाने कळशांवर डल्ला मारून लाख रुपयांचा गंडा

रत्नागिरी:- आपण वकील असल्याची बतावणी करत गावात भाड्याने खोली घेऊन राहायचे, गोड बोलून ग्रामस्थांचा विश्वास संपादन करायचा आणि अखेरीस श्रद्धेचा फायदा घेत हात साफ करायचा, असा चोरीचा एक अत्यंत अनोखा फंडा वाळवा तालुक्यातील केदारगाव परिसरात उघडकीस आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथून आलेल्या जीवन जाधव नामक भामट्याने देवकार्य आणि सवाष्णीच्या पूजेचे आमिष दाखवून गावातील महिलांकडून सुमारे एक लाख रुपये किमतीचे तब्बल वीस पितळेचे कळस लांबवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे केदारगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून, श्रद्धाळू ग्रामस्थांची फसवणूक करणाऱ्या या भामट्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील नाखरे गावचा रहिवासी असलेल्या जीवन जाधव याने केदारगावातील एका निवृत्त शिक्षकाच्या घरी भाड्याने खोली घेतली होती. आपण वकील असून पत्नी आणि मुलगी सोबत असल्याचे सांगत त्याने गावातील महिला आणि पुरुषांशी ओळखी वाढवून विश्वासाचे वातावरण निर्माण केले. जवळपास पंधरा दिवस गावात मुक्काम ठोकल्यानंतर, आपल्याला देवाची पूजा घालायची असून सवाष्णीचा कार्यक्रम करायचा आहे आणि त्यासाठी पितळेच्या कळशांची आवश्यकता असल्याचे त्याने काही महिलांना सांगितले. त्याच्या या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून केदारगाव येथील कुसुम माने यांनी पुढाकार घेत परिसरातील महिलांकडून देवकार्यासाठी पितळेचे कळस गोळा केले.

देवाचे कार्य आहे या श्रद्धेपोटी परिसरातील महिलांनी आपल्या घरातील पूजेसाठी वापरले जाणारे मौल्यवान पितळेचे कळस कुसुम माने यांच्याकडे सुपूर्द केले. मात्र, याच संधीचा फायदा घेत भामट्या जीवन जाधव याने ते सर्व वीस कळस एका पोत्यात भरले आणि गावातून पोबारा केला. कळस देवकार्याला जाण्याऐवजी परस्पर गायब झाल्याचे लक्षात येताच महिलांमध्ये मोठी चिंता आणि संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, कुसुम माने या स्वतः मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवतात आणि केवळ देवाच्या कामासाठी हातभार लागावा या प्रामाणिक भावनेतून त्यांनी कळस गोळा केले होते. आता कळस परत मागणाऱ्या महिलांना काय उत्तर द्यायचे, असा गंभीर पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

संबंधित भामट्याचा परिसरात शोध घेऊनही तो न सापडल्याने अखेरीस कुसुम माने यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपासात जीवन जाधव हा त्याच्या मूळ गावी म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील नाखरे येथेही भुरट्या चोऱ्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील केदारगावात पंधरा दिवस मुक्काम करून आणि सवाष्णीच्या पूजेचा बनाव रचून लाखभर रुपयांच्या कळशांवर डल्ला मारण्याच्या या नव्या प्रकारामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून, श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या अशा भामट्यांचा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.