Saturday, November 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गणपतीपुळे मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील पितळी घंटांची चोरी

गणपतीपुळे मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील पितळी घंटांची चोरी

रत्‍नागिरी:- तालुक्यातील श्री देव गणपतीपुळे देवस्थानच्या मालकीच्या गणपतीपुळे मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील दोन 16 हजार रुपये किंमतीच्या पितळी घंटा अज्ञाताने लांबवल्या. ही घटना गुरुवार 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.54 ते सायंकाळी 6 वा.कालावधीत घडली आहे. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश श्रीकृष्ण कोल्हटकर (49, रा.गणपतीपुळे, रत्‍नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, अज्ञात चोरट्याने श्री देव गणपतीपुळे येथील प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या तळ्याजवळील फायबर शेडच्या लोखंडी बारला लोखंडी साखळीने अडकवलेली 12 हजारांची 3 किलो वजनाची 18 सेमी व्यासाची पितळी घंटा तसेच प्रदक्षिणा मार्गाच्या उतारावरील पूर्वेकडील देवळी या देवस्थानच्या ठिकाणी लोखंडी रॉडला अडकवलेली 4 हजार रुपयांची 1 किलो वजनाची 12.5 सेमी व्यासाची पितळी घंटा अशा एकूण 16 हजार रुपये किंमतीच्या दोन घंटा चोरुन नेल्या. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 303(2) प्रमाणे भादंवि कायदा कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.