Sunday, November 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कोकण नगर येथून तरुणाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

कोकण नगर येथून तरुणाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील माजगाव रोड लगत असलेल्या कोकण नगर परिसरातून प्रेम प्रवीण खाकोडिया (वय १९) या मतिमंद तरुणाचे अज्ञात इसमाने पळवून नेऊन अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाची आई श्रीमती गंगा प्रवीण खाकोडिया (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजगाव रोडवरील कोकण नगर, गल्ली क्रमांक ३, अलिशान कॉर्नर येथील रहिवासी असलेल्या गंगा खाकोडिया यांचा १९ वर्षीय मुलगा प्रेम हा मतिमंद आहे. २१ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे चिडचिड करू लागल्याने आईने त्याला घराच्या आवारात फेरफटका मारण्यासाठी बाहेर सोडले होते. काही वेळाने कुटुंबीयांनी बाहेर पाहिले असता प्रेम त्या ठिकाणी आढळून आला नाही. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी तातडीने आजूबाजूच्या परिसरात, नातेवाईकांकडे, रत्नागिरी शहर तसेच रेल्वे स्थानक परिसरात त्याचा कसून शोध घेतला. मात्र सर्वत्र शोध घेऊनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. प्रेम हा स्वतःहून कोठेही जाण्याची शक्यता नसल्याने त्याला अज्ञात कारणासाठी कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून गुप्तपणे पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत अखेर त्याच्या आईने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.