भूसंपादनाच्या राजपत्राला विरोध; ग्रामस्थ एकवटले
रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद येथील सहा गावांमधील प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक, सेवा व खनिकर्म विभागामार्फत वाटद आणि कळझोंडी येथील जमिनींच्या भूसंपादनासंदर्भातील अधिकृत राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी सहा गावातील प्रमुखांची काल (ता. १०) सायंकाळी उशिरा बैठक झाली. यामध्ये राजपत्र रद्द करण्याची मागणी करण्याचा निर्णय एकमताने घेतला.
शासनाच्या अधिसूचनेनुसार वाटद, कळझोंडी, कोळीसरे, गडनरळ, वैद्यलावगण आणि कोळीसरे या सहा गावातील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रस्तावित केली होती. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या काही गावांमधील जमिन संपादन करण्याचा निर्णय कलम ३२(१) अन्वये घेतला आहे. त्यानुसार नुकतीच भूसंपादनाविषयीचे राजपत्र काढले आहे. त्यात वाटद येथील सुमारे ३४९ हेक्टर आणि कळझोंडी येथील ७५ हेक्टर मिळून एकूण ४२५ हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियामुळे बाधित गावांतील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे.
भूसंपादनाला विरोध करण्यासाठी काल झालेल्या या बैठकीत आपल्या हक्काच्या जमिनी आणि गावांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रसंगी प्रशासनाविरोधात कडाडून विरोध दर्शवण्याचा ठाम निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. “आमच्यावर बळजबरीने लादण्यात आलेल्या एमआयडीसीच्या नोटिशी सरकारने व प्रशासनाने तातडीने मागे घ्याव्यात,” अशी आग्रही मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. वाडवडिलांपासून जपलेली शेती आणि नैसर्गिक साधनसंपत्ती कोणत्याही परिस्थितीत उद्योगांच्या घशात घालू देणार नहीं, “आपले गाव जगले,तरच राजकीय पक्ष जगतील; गावच उदुवस्त्त झाले तर राजकारणाचा उपयोग काय? असा पवित्रा ग्रामस्थांनी या बैठकीत घेतला आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास जनआंदोलन तीव्र करण्याचा इशाराही बाधित गावांतील ग्रामस्थांनी दिला आहे.
वाटद पंचक्रोशीतील ९१८ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ७२५ हेक्टर क्षेत्र हे आंबा-काजू बागायती आणि भातशेती असून, ते तिथल्या स्थानिक ग्रामस्थांचे व शेतकऱ्यांचे मुख्य उपजीविकेचे साधन आहे. असे असतानाही तिथे एमआयडीसीचा घाट घालण्यामागे सरकारचा नेमका कोणता उद्देश आहे. प्रस्तावित एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये ऐतिहासिक मंदिरे,कातळ शिल्पे,जैवविविधतेने नटलेला निसर्ग, नैसर्गिक पाण्याचे स्रोत, मोर, लांडोर, शालिंदर, ससे, बिबट्या यांसारखे वन्यजीव अनेक वर्षांपासून वास्तव्य करून आहेत. इतर रत्नागिरीतील किंवा अन्य एमआयडीसींमधील पडीक जागांच्या विकासाचा उद्देश बाजूला सारून, बागायती आणि नंदनवन असलेल्या भागातच असे प्रकल्प रेटणे कितपत योग्य आहे ? हे लक्षात घेऊन ३२(१)राजपत्र आणि वाटद एमआयडीसी अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करावी. -उमेश रहाटे, आंबाबागायदार, वाटद
-









