रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील लाइट हाऊस ते हनुमान स्टॉप, किल्ला दरम्यान तीव्र उताराच्या रस्त्यावर भरधाव अॅक्टिव्हा घसरून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रेम भिम ओड (वय ३०, मूळ रा. पिपळकंटागाव, ता. बडीकेदार-३, जि. डोटी, पश्चिम नेपाळ, सध्या रा. गोडावून स्टॉपजवळ, कोहीनूर सोसायटी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत चालकाचे नाव आहे.
याप्रकरणी रस्त्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता, हयगयीने व निष्काळजीपणाने दुचाकी चालवून स्वतःच्या मृत्यूस तसेच पत्नी, मेहुणी व लहान मुलांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी खुद्द मृत चालकाविरुद्धच विविध कलमान्वये अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रेम ओड हा आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचाकीवरून (क्रमांक एमएच ०८ एए ०२२६) पत्नी कोमल, मेहुणी हिमा शेर ओढ व तिची दोन लहान मुले अशा एकूण पाच जणांना बसवून लाइट हाऊस ते हनुमान स्टॉप किल्ला या तीव्र उताराच्या रस्त्यावरून येत होता. एकाच दुचाकीवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून तीव्र उतारावर निष्काळजीपणे आणि अविचाराने वाहन चालवल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भीषण अपघात घडला. या अपघातात प्रेम ओड याच्यासह दुचाकीवरील प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने प्रथम रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रेम ओड याचा मृत्यू झाला.
सदर प्रकरणी सुरुवातीला सावर्डे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासासाठी कागदपत्रे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली होती. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बाळ रमेश पालकर यांनी केलेल्या सखोल तपासात, मयत चालकाने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळेच हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस हवालदार पालकर यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी मयत चालक प्रेम भिम ओड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









