Saturday, October 10, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लांजात सराईत गुन्हेगारावर पोलिसांची कारवाई

लांजात सराईत गुन्हेगारावर पोलिसांची कारवाई

बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या वावरताना गुन्हा दाखल

लांजा:- लांजा येथील एसटी बसस्थानक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लांजा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत नामदेव सुतार (वय ३२, मूळ रा. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली, सध्या रा. जाकादेवी, ता. जि. रत्नागिरी) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लांजा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक देवकन्या विठ्ठल मैदाड व त्यांचे पथक गस्तीवर असताना, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास लांजा बसस्थानक परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो चोरी करण्याच्या उद्देशाने सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापर्यंतच्या कालावधीत परिसरात संशयित हालचाली करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी केली असता, त्याच्यावर यापूर्वी सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कायद्यांतर्गत तसेच मुंबई पोलीस कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद समोर आली आहे.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक देवकन्या मैदाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२ (ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कायदेशीर तरतुदीनुसार आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. पोलीस हवालदार उर्मिला शेंडे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार जान्हवी मांजरे करत आहेत. रात्रीच्या वेळी बसस्थानक व सार्वजनिक ठिकाणी अशा संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर लांजा पोलिसांची करडी नजर आहे.