Saturday, October 10, 2026
spot_img
Home गुन्हेगारी खेड येथे भरदिवसा घरफोडी; पावणेआठ लाखांचा ऐवज लंपास

खेड येथे भरदिवसा घरफोडी; पावणेआठ लाखांचा ऐवज लंपास

खेड:- खेड शहरातील भरणे बाईतवाडी येथील एकाच इमारतीमधील दोन फ्लॅट्सचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी तब्बल ७ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे खेड परिसरात मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:१५ ते १:२५ या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी अभय सहदेव देसाई (वय ४९, मूळ रा. भडगाव, सध्या रा. रूम नं. १०१, आदित्य रेसिडेन्सी, रोटरी स्कूलजवळ, भरणे बाईतवाडी, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी अभय देसाई हे कामा निमित्त घराबाहेर असताना त्यांचे आदित्य रेसिडेन्सीमधील रूम नं. १०१ चे घराचे मुख्य प्रवेशद्वाराचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. तसेच याच इमारतीत रूम नं. १०३ मध्ये राहणारे त्यांचे शेजारी मिलिंद तुकाराम आदावडे यांच्याही बंद घराची कडी-कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश करून डल्ला मारला.

चोरीस गेलेला ऐवजामध्ये सोन्याच्या २ चेन्स: अंदाजे १ तोळा व ६ ग्रॅम, सोन्याचे २ ब्रेसलेट: प्रत्येकी ३ ग्रॅम, सोन्याच्या कानातल्या रिंग्स: ५ ग्रॅम व ६ ग्रॅम, सोन्याचा हार: १ तोळा वजनाचा, सोन्याचे ३ कॉइन्स: एकूण ३ तोळे वजनाचे, सोन्याचे टॉप्स: २ ग्रॅम, सोन्याची बाळी: १ ग्रॅम, सोन्याची नथ: अडीच ग्रॅम,
चांदीचे दागिने व भांडी: पाव किलो चांदी,
चांदीचा कमरबंध, रोख रक्कम: १०,००० रुपये असा एकूण ७,९८,००० रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे.
दुपारच्या वेळेत बंद घरांचा गैरफायदा घेऊन झालेल्या या मोठ्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३३१(३) आणि ३०५(अ) अन्वये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, खेड पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत.