Friday, October 9, 2026
spot_img
Home रत्नागिरी कोकणातील जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

कोकणातील जिल्ह्यांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात परतीचा पाऊस आणि ‘ऑक्टोबर हिट’चा दुहेरी मारा

रत्नागिरी:- यंदाच्या मान्सूनचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला असून राज्यात परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात होत असलेल्या हवामान बदलांमुळे महाराष्ट्रातील हवामानावर त्याचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या या परतीच्या प्रवासात राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, तर दुसरीकडे उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ६ आणि ७ ऑक्टोबरसाठी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

यंदाच्या मान्सून हंगामात राज्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस झाला असला तरी, अनेक भागात पावसाची मोठी तूट जाणवली आहे. आता मान्सूनचा निरोप घेण्याचा काळ जवळ आला असतानाच, परतीच्या पावसाने काही भागांत पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सध्या राज्यात संमिश्र हवामान पाहायला मिळत असून एकाच वेळी पावसाच्या हलक्या सरी आणि वाढती उष्णता अशा दुहेरी वातावरणाचा अनुभव नागरिकांना येत आहे.
कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला इशारा
कोकण किनारपट्टीचा विचार करता, पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विशेषतः संध्याकाळनंतर किंवा रात्रीच्या वेळी काही भागांत पावसाच्या सरी कोसळू शकतात. कोकणात या काळात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून उकाडा प्रचंड वाढला आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील स्थिती
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मुख्यतः हवामान कोरडे राहील. परंतु, कोल्हापूर, सातारा आणि लगतच्या घाट माथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत कोणताही गंभीर अलर्ट नसला तरी गडचिरोली जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोलीमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता असून हा इशारा ७ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उकाडा वाढणार
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी असून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊन उकाडा आणि दमटपणा वाढू शकतो. उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची विश्रांती असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्वच जिल्ह्यांमध्ये सूर्यकोप पाहायला मिळू शकतो. येथे कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवेल.

राज्यात सध्या निर्माण झालेल्या या मिश्र वातावरणामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले असून सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच, परतीचा पाऊस आणि वाढती उष्णता यापैकी कोणाचा प्रभाव येत्या दिवसांत अधिक राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतात काढणीला आलेली पिके आणि मान्सूनच्या शेवटी होणारा हा पाऊस यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग सध्या चिंतेत सापडला असून हवामानाच्या या खेळामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.