Sunday, September 27, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लांजा रिंगणे येथे घरफोडी: ग्रामस्थांच्या धाडसी पाठलागामुळे चोरटे जेरबंद

लांजा रिंगणे येथे घरफोडी: ग्रामस्थांच्या धाडसी पाठलागामुळे चोरटे जेरबंद

लांजा:- तालुक्यातील रिंगणे गांगोवाडी येथे भरदिवसा एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःच्या खाजगी वाहनाने थरारक पाठलाग करून राजापूर तालुक्यातील कारवली येथे जेरबंद केले. पकडण्यात आलेले दोन्ही संशयित बीड जिल्ह्यातील असून, त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे घातक साहित्य आणि नंबरप्लेट नसलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिंगणे गांगोवाडी येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या कामानिमित्त कुर्ला (मुंबई) येथे वास्तव्यास असलेले संतोष श्रीधर आयरे यांचे घर बंद होते. शनिवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास संशयित चोरट्यांनी या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा मोठ्या स्क्रू पानाच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. घरफोडीची ही घटना लक्षात येताच रिंगणे गावचे सरपंच संजय आयरे, महेश विश्वासराव कोंडगे आणि कुरंग येथील गणेश सुर्वे यांनी तात्काळ सतर्कता दाखवली. आरोपी चोरी करून घटनास्थळावरून पळ काढत असल्याचे समजताच या तिघांनी जराही वेळ न दवडता आपल्या खाजगी वाहनाने चोरट्यांचा थरारक पाठलाग सुरू केला.

लांजा ते राजापूर दरम्यान अनेक किलोमीटरचा पाठलाग करत त्यांनी राजापूर हद्दीतील कारवली येथे चोरट्यांना गाठून अत्यंत धाडसाने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या धाडसी कारवाईत संजय उर्फ मोहन निकाजा भोसले (वय २१) आणि नितेश उर्फ संतोष मरदान भोसले (वय २५, दोघेही रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली सुमारे ७० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल (नंबरप्लेट नसलेली), मोठा पोपट पाना, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी सुरा, कटर, हॅन्ड ग्लोव्हज, मास्क तसेच ओळखपत्र अशी सामग्री जप्त करण्यात आली आहे. यातील नितेश भोसले याच्यावर सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी फिर्यादी जयेश संदीप आयरे (वय २६, रा. रिंगणे गांगोवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २४७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेलार (ब. नं. ४०९) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे व धाडसामुळे एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला असून परिसरात त्यांचे मोठे कौतुक होत आहे.