कोमसापच्या १८ वे केंद्रीय साहित्य संमेलन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन!
रत्नागिरी:- मराठी भाषा ही केवळ जपायची नसून ती नव्या पिढीपर्यंत आणि जगभरात पोहोचवणे ही काळाची गरज आहे. साहित्य संमेलनांचा खरा केंद्रबिंदू साहित्यिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य मराठीप्रेमी असला पाहिजे हा या संमेलनाचा हेतू आहे. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि समृद्धी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी कोमसापच्या संमेलन कार्यालय उद्घाटन प्रसंगी केले.
कोमसापच्या १८ व्या केंद्रीय साहित्यिक संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक बाळ फोंडके यांची निवड करण्यात आली आहे. मराठी भाषा मंत्री ना.उदय सामंत यांनी विज्ञान साहित्यिक बाळ फोंडके यांच्या नावाची घोषणा यावेळी केली.
कवी केशवसूत स्मारक संकुल, मालगुंड (जि. रत्नागिरी) येथे २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १८ व्या केंद्रीय साहित्य संमेलनाचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना मराठी भाषेच्या संवर्धनावर आणि भविष्यातील दिशांवर विशेष भर देण्यात आला.
कोमसापच्या संमेलन कार्यालयाचे उद्घाटन मारुती मंदिर येथील साईरत्न इमारतीत झाले. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा कोमसापचे सल्लागार डॉ. तानाजीराव चोरगे, संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, कार्यवाह गजानन पाटील, दिपक पटवर्धन आदी उपस्थित होते.
तरुणांसाठी संमेलन मालगुंड येथे घेण्याचा निर्णय – नमिता कीर
मालगुंड येथे कोमसापचे संमेलन होत असल्याने आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. रत्नागिरीत आज संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले ही या संमेलनाची नांदी आहे. कोमसापला आज 35 वर्ष झालीत या 35 वर्षात आपण 18 संमेलन घेतली. संमेलनातली विशेष बाब म्हणजे दोन संमेलन आपण परदेशात जाऊन घेतली. कोमसापचा जन्मच रत्नागिरीत झाला असल्याने या 35 वर्षांची वाटचाल रत्नागिरीकरांसाठी नवीन नाहीय. कोमसापच्या 35 वर्षांपैकी जवळजवळ 22 वर्ष मी या संस्थेसोबत जोडली गेली असल्याचा मला अभिमान असल्याचे केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी यावेळी बोलताना सांगितले. मधुभाईंनी निर्मिलेली ही कोमसाप विशालत्व आणि सृजनत्व घेऊनच जन्माला आलेली आहे. यामुळे तिच्यात नवीन नवीन निर्माण होत आणि नवीन नवीन अनेक माणसं यात येऊन सामील होतात. आज या संस्थेचा मोठा वटवृक्ष तयार झाला आहे. गावातल्या तरुणाच्या, वाचकांच्या हाती संमेलन द्यावे यासाठी संमेलन मालगुंड येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमिता कीर यांनी यावेळी सांगितले. साहित्याची चळवळ आता तरुण पिढीने पुढे न्यायची आहे आम्ही मार्गदर्शक म्हणून आहोतच असेही त्या यावेळी म्हणाल्या. देशात आज 40 टक्के तरुण आहेत आणि या तरुणांकडे आपल्याला अनेक चांगल्या कामांची सूत्र सोपवायची आहेत आणि कोमसापने ही सुरुवात या संमेलनातून केली असल्याचे नमिता कीर यावेळी म्हणाल्या.









