Tuesday, November 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी चंपक मैदान येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत ११ वर्षीय मुलगी जखमी

चंपक मैदान येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत ११ वर्षीय मुलगी जखमी

बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- येथील चंपक मैदानावरील फन फेअर मधून बाहेर पडणाऱ्या कच्च्या रस्त्यावर भरधाव व बेदरकारपणे दुचाकी चालवून पायी जाणाऱ्या ११ वर्षीय मुलीला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मैत्रेयी निलेश आंबेरकर (वय ११, रा. गणाधीश अपार्टमेंट, फाटक हायस्कूलजवळ, गाडीतळ, रत्नागिरी) असे या अपघातात जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. तर मोहम्मद कैफ इकबाल मल्ला (वय २३, रा. समीरा अपार्टमेंट, राजापुरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद कैफ मल्ला हा शनिवारी रात्री चंपक मैदानातील फन फेअरच्या पार्किंगमधून आपली दुचाकी (टी.व्ही.एस. एन्टॉर्क, क्र. एमएच-०८/बीएम-३१०३) काढून मित्राला मागे बसवून बाहेर पडत होता. फन फेअरमधून बाहेर जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर गर्दी आणि रस्त्याची परिस्थिती असतानाही त्याने त्याकडे दुर्लक्ष करत अत्यंत निष्काळजीपणे व भरधाव वेगात दुचाकी चालवली. याच दरम्यान रस्त्यावरून पायी पुढे चालत असलेल्या मैत्रेयी आंबेरकर हिला त्याच्या दुचाकीची मागून जोरदार धडक बसली. या अपघातात मैत्रेयी जखमी झाली आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रविण कल्लापा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) रात्री उशिरा दुचाकीस्वार मोहम्मद कैफ मल्ला याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा (गु.र.नं. ३०२/२०२६) दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.