Wednesday, August 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पालीतील दुचाकी चोरीचा अवघ्या २४ तासात छडा

पालीतील दुचाकी चोरीचा अवघ्या २४ तासात छडा

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली घडशीवाडी येथे घरासमोर उभी करून ठेवलेल्या हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीचा पाली पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी २४ तासात छडा लावला. चोरलेली ही दुचाकी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताब्यात घेण्यात आली.

पालीतील सचिन शिवाजी गोंधळी (पाली घडशीवाडी) यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच ०८ एव्ही ४२९२) ही पालीतील घडशीवाडी सुमित्रा चाळ येथे घरासमोर २० ऑगस्ट रोजी रात्री लावून ठेवली होती. त्यानंतर २१ रोजी सकाळी ती त्यांनी पाहिली असता दुचाकी जागेवर दिसली नाही. त्यांनी पोलीसात तक्रार नोंदवली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

पाली पोलीस दूरक्षेत्राचे तपासी अंमलदार हेडकॉन्स्टेबल सागर जाधव यांनी पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील यांच्या सहकार्याने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. ही दुचाकी २१ रोजी रात्री ९ वाजता देवगड – निपाणी रस्त्याच्या बाजूला लावलेल्या स्थितीत असल्याचे समजले. त्यानुसार तेथे जाऊन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.