Wednesday, August 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी आठवडा बाजारात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या २ ट्रॅव्हल्स चालकांवर गुन्हा

आठवडा बाजारात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या २ ट्रॅव्हल्स चालकांवर गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात रहदारीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने रस्त्यावर हयगयीने आणि बेजबाबदारपणे ट्रॅव्हल्स गाड्या उभ्या करणाऱ्या दोन वेगवेगळ्या चालकांवर रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई रविवारी रात्रीच्या सुमारास तेली आळी नाका ते आठवडा बाजारकडे जाणाऱ्या मार्गावर करण्यात आली.

रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तेली आळी नाका ते आठवडा बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वक्रतुंड ट्रॅव्हल्स दुकानासमोर ही घटना घडली. आरोपी साईनाथ बाळू पिसाळ (वय ३८, मूळ रा. वाई, जि. सातारा, सध्या रा. आठवडा बाजार, रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील ट्रॅव्हल्स बस (क्र. एम.एच. ०९ जीजे ४३५६) ही रस्त्यावर ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना आणि रहदारीस मोठा अडथळा होईल अशा बेजबाबदारपणे उभी केली होती. याप्रकरणी पोहेकाँ/३०८ कशल सुरेश हातिस्कर यांच्या फिर्यादीवरून रात्री पावणेअकरा वाजता आरोपी चालकाविरुद्ध गु.र.नं. २८६/२०२६ नुसार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच दिवशी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या काही वेळ आधी तेली आळी नाका ते आठवडा बाजारकडे जाणाऱ्या स्वामी ट्रॅव्हल्स दुकाना समोरील रोडवर दुसरी कारवाई करण्यात आली. आरोपी वैभव रामचंद्र कदम (वय ३८, मूळ रा. भेलसई, ता. खेड, सध्या रा. खेर्डी, चिपळूण) याने आपल्या ताब्यातील वक्रतुंड ट्रॅव्हल्स (क्र. एम.एच. ४७ बीएल ८८७९) ही गाडी रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत पार्क केली होती. या प्रकरणी पोहेकाँ/१४४७ पंकज यशवंत पडेलकर यांच्या फिर्यादीवरून रात्री पावणेदहा वाजता गु.र.नं. २८५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर निष्काळजीपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवर शहर पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.