Sunday, August 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी ओरी येथे टेरेसची साफसफाई करताना खाली पडल्याने मजुराचा मृत्यू

रत्नागिरी ओरी येथे टेरेसची साफसफाई करताना खाली पडल्याने मजुराचा मृत्यू

रत्नागिरी:- घराच्या टेरेसची साफसफाई करत असताना पाय शेवाळ्यावरून घसरून खाली जमिनीवर पडल्याने गंभीर दुखापत झाल्यामुळे एका इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्घटनेची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली आहे. हा अपघात १५ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बाळकृष्ण देसाई (वय ५८, रा. मौजे ओरी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी विनीता विजय साळवी यांच्या बंगल्याचे टेरेस साफ करण्याचे काम सुरू असताना संतोष देसाई यांचा पाय अचानक शेवाळ्यावरून घसरला. त्यामुळे ते टेरेसवरून थेट खाली जमिनीवर कोसळले, ज्यामध्ये त्यांच्या डोक्यास व शरीराला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी १५ ऑगस्ट रोजी दुपारी १:४५ वाजता रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे घोषित केले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (अमृत क्रमांक ९८/२०२६) नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.