Tuesday, July 21, 2026
spot_img
Home रत्नागिरी विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमधील घटना

रत्नागिरी:- राहत्या घरी गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिलिंद सुरेश भुवड (वय ३०, रा. साखळोली गणेशवाडी, ता. दापोली) असे मयत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद भुवड याने ११ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दापोली येथील आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने दापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते.

मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी १२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता त्यांना रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना, १३ जुलै रोजी सायंकाळी ४.५५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या प्रकरणी मयताचे मेहुणे लहू रामचंद्र कदम यांनी पोलिसांना खबर दिली होती. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (अमृ. क्रमांक ५३/२०२६) करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.