पेट्रोलचा १०८.५८ तर डिझेलचा ९५.०८ रुपये प्रतिलिटर भाव
रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले आहे. याचे थेट परिणाम आता स्थानिक बाजारपेठेवर जाणवू लागले असून, आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. रत्नागिरीत पेट्रोल १०८.५८ तर डिझेल ९५.०८ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत १० ते १३ टक्क्यांनी वाढ झाल्याने तेल कंपन्यांनी हा भार ग्राहकांवर टाकला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ झाली आहे. रत्नागिरीत पेट्रोलच्या पुर्वीचा दर १०५.४८ होता तर नवीन दर १०८.५८ आहे. डिझेलच्या जुन्या दरांच्या ९१.९७ तुलनेत ९५.०८ रुपये एवढी मोठी वाढ झाली आहे.
इंधनाचे दर वाढल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार आहे. याचा थेट परिणाम भाजीपाला, फळे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आधीच महागाईने होरपळणाऱ्या रत्नागिरीकरांना आता इंधन दरवाढीचा नवा सामना करावा लागणार आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी परिसरात होत असलेल्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारतासारख्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशावर याचा मोठा आर्थिक बोजा पडत आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत इंधन दर स्थिर राहण्याची चिन्हे कमीच आहेत.









