कुवारबाव येथे उभ्या शिवशाहीला दुचाकीची जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी

सहप्रवासी तरुण जखमी

रत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर महामार्गावर कुवारबाव येथील रेल्वे स्टेशनसमोर मंगळवारी रात्री १० ते ११ च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या शिवशाही बसला पाठीमागून आलेल्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री रत्नागिरीच्या दिशेने जाणारी शिवशाही बस (MH 09 EM 9188) कुवारबाव येथील बस स्टॉपवर प्रवासी उतरवण्यासाठी थांबली होती. याच वेळी हातखंबा बाजूकडून रत्नागिरीच्या दिशेने एक दुचाकी (MH 08 BB 2841) अत्यंत वेगाने येत होती. दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती थेट उभ्या असलेल्या बसच्या पाठीमागच्या भागावर जाऊन आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी बसच्या खालच्या भागात अडकली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दुचाकीचा वेग अंदाजे १२० किमी प्रति तास इतका होता. धडक बसताच दुचाकीस्वारांचे तोंड बसवर जोरात आदळल्याने ते रक्तबंबाळ झाले. या अपघातात रोहित राजू सावंत व साईराज संतोष धोत्रे (दोघांचे वय २३ वर्षे) यापैकी दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी असून सहप्रवासी तरुण जखमी झाला आहे.

​अपघात घडताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दोन्ही तरुणांना तत्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर इजा झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.