मित्राच्या मरणास कारणीभूत; दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा

पावस:- निष्काळजीपणे दुचाकी चालवून मागे बसलेल्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.संकल्प सुभाष सकपाळ (वय १९, रा. काराजनगी, खुर्द निगडी, ता. जत, जिल्हा सांगली) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना २६ जानेवारीला दुपारी पावणे एकच्या सुमारास गावखडी बंडबेवाडी एसटी स्टॉप येथील मैल दगड ६१६ अंतरावर घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित संकल्प सकपाळ हा त्याचा मित्र सुजल संजय घोरपडे याला दुचाकी (क्र.एमएच-१० इजे ४७७०) वरुन मागे सुजल याला बसवून रत्नागिरी-पुर्णगड ते नाटे रस्त्यावरुन कशेळी बीचकडे जात असताना गावखडी बंडबेवाडी रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघात केला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुजल घोरपडे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण वीर यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.