निवडी दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडून ओळख परेड
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतील गटनेता निवडीला मान्यता देताना जिल्हाधिकाऱ्यांनी नव्यानेच चिकित्सक पद्धती अवलंबली आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक बाळू साळवी यांची तर भाजपाकडून नगरसेवक राजू तोडणकर यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. उबाठा शिवसेनेकडून गटनेता म्हणून केतन शेटय़े यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. न.प.तील प्रत्येक पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी गटनेता म्हणून निवड केली आहे.
रत्नागिरी नगर परिषदेतील गटनेता निवडीला मान्यता देण्यासाठी ज्या राजकीय पक्षाच्या नगरसेवकांनी आपला गटनेता निवडला त्या सर्व नगरसेवकांची जिल्हाधिकारी दालनात ओळख परेड करून घेत गटनेत्यांच्या निवडीला मान्यता मिळणार आहे. यापूर्वी गटनेता निवडीचे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर त्या गटनेत्याच्या निवडीला मान्यता दिली जात होती. आता गटनेता निवडीमध्ये राजकीय पक्षांना कायदेशीर अडचण निर्माण होवू नये, त्याचबरोबर गटनेता मान्यतेचा राजकीय मुद्दा बनू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी ओळख परेडसारखी प्रक्रिया राबवली आहे. नगरसेवकांच्या सह्यांचे प्रतिज्ञापत्र घेवून गेलेल्या राजकीय पक्षाचे नेते आणि निवडलेल्या गटनेत्यांना त्यांच्या सर्व नगरसेवकांना समक्ष येण्यास सूचित केले.
रत्नागिरी नगर परिषदेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक बाळू साळवी यांची सर्व नगरसेवकांनी गटनेता म्हणून निवड केली आहे. त्याचबरोबर भाजपाचे नगरसेवक राजेश उर्फ राजू तोडणकर यांची भाजप गटनेतापदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना उबाठाकडून केतन शेटय़े यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सात नगर परिषद, नगर पंचायतींच्या सर्व गटनेता निवडीबाबत ओळख परेड हीच प्रक्रिया अवलंबण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. नगरसेवकांची ओळखपरेड करण्याची नवीन पद्धत संबंधीत राजकीय पक्ष आणि जिल्हा प्रशासनालाही सुरक्षित झाली आहे.









