रत्नागिरी:- येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील माजी प्राध्यापक तसेच प्रसिद्ध चंदा आईस्क्रीमचे संस्थापक विजय गजानन केळकर (वय ८०) यांचे शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास राजेंद्र नगर येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. मूळचे नागपूरचे असलेले केळकर वाणिज्य शाखेच्या अध्यापनासाठी रत्नागिरी येथे येऊन स्थायिक झाले होते. त्यांनी महाविद्यालयात २५ वर्षांहून अधिक काळ प्राध्यापक म्हणून काम पाहिले असून महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षात राहणाऱ्या शैलीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांनी जाहिरातकला या विषयावर लिहिलेले पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले होते. वाणिज्य विषयासोबतच त्यांना संगीत, कला, नाटक, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्राचाही दांडगा व्यासंग होता. एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करताना त्यांनी चंदा आईस्क्रीम हा उत्पादन व्यवसाय सुरू करून तो नावारूपास आणला. तसेच विठ्ठल मंदिराजवळ त्यांनी सुरू केलेले राजा आईस्क्रीम पार्लर महाविद्यालयीन तरुणाईमध्ये विशेष प्रसिद्ध होते.
सन १९९५ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. निवृत्तीच्या वेळी रत्नागिरीत शिक्षण क्षेत्रात प्रथमच मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी त्यांनी संस्थेला भरघोस देणगी दिली होती आणि आज त्यांच्या नावाने सुरू असलेली ही संस्था त्यांच्या कार्याची सतत आठवण करून देते. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचा देह रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी, मुलगा विक्रांत आणि मुलगी मधुचंदा असा परिवार आहे.









