31 जणांना नोटीसा; एकाचीही तक्रार नाही
रत्नागिरी:- स्मार्ट सीटीच्या दृष्टीने रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील लक्ष्मी चौक ते तेळीआळीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाने वेग घेतला आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने या रस्त्यामध्ये अतिक्रमण करणाऱ्या ३१ जणांना नोटीस बजावली आहे. याबाबत शहरातील संबंधित व्यापाऱ्यांची एकही लेखी तक्रार पालिकेला मिळालेली नाही. यामुळे या रुंदीकरणाला व्यापाऱ्यांनी हिरवा कंदील दिल्याचे चित्र आहे.
रत्नागिरी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मुख्य बाजारपेठेतील अरुंद रस्ते हा त्याचा मुख्य अडसर ठरत आहे. अरुंद रस्ते ही दुसरी मोठी समस्या बाजारपेठेत आहे. त्यात मालगुंड, गणपतीपुळे, आरे-वारे करून रत्नागिरीत, तसेच पावसला जाण्यासाठी चि येणारे पर्यटक मुख्य बाजारपेठेत आले की गोंधळून जातात. त्यामुळे गेली चार दशके रखडलेल्या बाजारपेठेतील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. नगररचना विभागाच्या नोटिसीनंतर कामाला वेग येण्याची शक्यता आहे.
या रस्त्यामध्ये अतिक्रमण करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून व्यवसाय विस्तारला आहे. रस्ता रुंदीकरण झाले तर यातील अनेकांचा निम्मा भाग या रुंदीकरणामध्ये जाऊन त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या रुंदीकरणाला अनेक व्यावसायिकांचा अंतर्गत प्रचंड विरोध आहे. परंतु, उघड उघड विरोध करण्यास ते तयार नाहीत. पालिकेकडे विरोध दर्शवणारी एकही तक्रार नसल्याने लवकरच पालिका पुढचे पाऊल उचलणार आहे.









