Saturday, November 28, 2026
spot_img
Home चिपळूण कोंडमळा येथे ट्रकला भरधाव दुचाकीची धडक; दोन तरुण गंभीर जखमी

कोंडमळा येथे ट्रकला भरधाव दुचाकीची धडक; दोन तरुण गंभीर जखमी

चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे नजीक कोंडमळा येथील उतारावर थांबलेल्या एका मालवाहू ट्रकला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याचा भीषण अपघात शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडला. मुंबईहून आपल्या गावी परतत असताना झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल येथील सूरज डावल (वय २५) आणि ऋतिक गिजे (वय २३) अशी या अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण मुंबई येथून दुचाकीने आपल्या गावी ओझरखोल येथे जाण्यासाठी निघाले होते. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास त्यांची दुचाकी कोंडमळा परिसरातील उतारावर आली असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला त्यांची जोरदार धडक बसली.

ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिकांनी जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवले असून, सध्या त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर विशेषतः उताराच्या ठिकाणी अवजड वाहने उभी करण्याच्या प्रकारामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पहाटेच्या वेळी अंधुक प्रकाश आणि कमी दृश्यमानता असताना महामार्गावर अशा प्रकारे थांबलेली अवजड वाहने इतर प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहेत. त्यामुळे महामार्गावर अवजड वाहने उभी करण्याबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत व योग्य खबरदारी घेतली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या अपघाताप्रकरणी जखमी सूरज डावल यांचे काका संजय सखाराम डावल यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सायंकाळपर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. सावर्डे पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.