चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात भरधाव कंटेनरने डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कळवंडे येथील सौरभ महादेव वाघे (वय २५) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या गेट क्रमांक २ जवळील वळणावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक विपुल राम अवतार सिंग (वय २७, रा. हाथौडी, ता. मेहनगर, जि. आझमगड, उत्तर प्रदेश) हा त्याच्या ताब्यातील कंटेनर (क्र. एमएच-४६ बीयू-५३९१) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. परशुराम घाटातील तीव्र उतार आणि अवघड वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. भरधाव कंटेनर थेट दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून गोवा-मुंबई लेनवर गेला आणि समोरून येणाऱ्या पॅशन प्रो दुचाकीला (क्र. एमएच-०८ एएम-६४२२) जोरदार धडक दिली.
वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
या अपघातात दुचाकीस्वार सौरभ महादेव वाघे (रा. कळवंडे सातीनवाडी, ता. चिपळूण) याच्या मृत्यूस तसेच स्वतःच्या दुखापतीस कंटेनर चालक कारणीभूत ठरला आहे. या प्रकरणी मयत सौरभचे वडील महादेव सखाराम वाघे (वय ५५) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५४ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कळवंडे परिसरात शोककळा पसरली असून, चिपळूण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









